Skip to main content

आधी वास्तुशास्त्र तर समजून घ्या.

*कोणीतरी मला फॉरवर्ड केलेला लेख व त्याला माझे उत्तर*

       *फॉरवर्डेड लेख*

*वास्तु*

केवढी पवित्र जागा!
जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. पंढरपूरला गेल्यावर विठूमाऊलीच्या शेजारी न उभ्या राहता रुसून मागच्या बाजूला उभ्या राहिलेल्या रुक्मिणी आईसाहेबांना हात जोडून प्रेमळ भक्त विनंती करतो, "आई, तुम्ही आमच्या विठूरायावर रागावू नका. तुम्ही जोडीने छान दिसता. शिव-शक्ती एकवटली, की भक्ताला भक्तीचा समुद्र उचंबळल्यासारखा वाटतो." तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले, म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात." CONDUCT OF PARENTS IS EDUCATION OF CHILDREN.
मुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा उकिरडा करतो आणि वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात. अरे कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का? तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू किती समाधानी ठेवू शकता. ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा. रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे. काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात. माळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसे आदरणीय वाटतात. मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी. सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे. घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे. घरात महापूजा करावी. पवमानसूक्त किंवा लघुरुद्र करावा. सप्तशतीचा पाठ उत्तम. भोजनाने वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे व वागावे. तिन्ही सांजेला रामरक्षा, हनुमान स्तोत्र, दत्तबावनी धूप टाकून म्हणावी. कुलदेवतेचे सणवार साजरे करावेत. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे. गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल. अग्नीत तेल ओतून वातावरण आणखी गरम होईल. चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात. स्त्रियांच्या कपाळावरचा कुंकुम तिलक, पायातली जोडवी आणि गळ्यातले मंगळसूत्र ही स्त्रियांची सौभाग्याची फार मोठी शक्ती असते. पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे. सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही." मेली पुरुषाशी जात" ह्या पुस्तकात ललिता बापट यांनी पुरुषांना चांगलेच सुनावले आहे. अशी राहाते समाधानी वास्तु!
मोडतोड, दिशाबदल, कासव, पिरॅमिड, मंत्रांची कॅसेट वाजवत ठेवणे व स्वतः चकाट्या पिटत बसणे, हे सारे व्यर्थ आहे. तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी!
नमस्कार!

  
*वरच्या लेखाला माझे उत्तर*

1)(मी अमोल लेले, तथास्तु वास्तु रिसर्च फाऊंडेशन. भारतीय शास्त्रांबद्दल अविश्वास असणाऱ्यांसाठी हा लेख नाही. त्यामुळे त्यांनी या लेखासंबंधी आक्षेप, प्रश्न विचारून माझा व स्वतःचा वेळ वाया घालवू नये. शास्त्र प्रेमी विद्यार्थी, ज्ञानार्थींच्या प्रश्न व शंकांचे निरसन मात्र मी माझ्या क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करीन. आपण कॉल करू शकता 9004813975 किंवा 8850517626 या क्रमांकावर)

वरील लेख आपण फॉरवर्ड केलेला आहे किंवा स्वतः लिहीलेला आहे याबद्दल मला माहीती नाही. पण विचाराला विचाराने उत्तर देणे भाग आहे. हे उत्तर विचाराला आहे व्यक्तिला नाही. तेव्हा व्यक्तिगत राग धरू नये ही विनंती. नविन नविन विचार वाचताना भारतीय शास्त्रांची बाजू मांडलीच जात नाही असे होऊ नये म्हणून केवळ शास्त्रप्रेमी व शास्त्र अभ्यासकांच्या वतीने मी माझ्या क्षमतेने विचार मांडत आहे. बाकी वास्तुदेवता समर्थ आहे.
वास्तुपुरूषाय नमः। वास्तु ब्रह्मणे नमः

सर्व प्रथम वरील लेखाच्या उद्देशासंदर्भात बोलतो. 'वास्तु आनंदी असावी, समाधानी असावी. आणि हा आनंद फक्त भौतिक पातळीवरचा असतो. तर केवळ असा भौतिक पातळीवरचा आनंद नाही तर आत्मिक पातळीवरचे समाधान सर्वांना मिळावे . थोडक्यात सर्व सुखी व्हावेत' असा अतिशय प्रामाणिक आणि चांगला हेतू ठेवून लिहिलेला लेख असल्याने त्यासाठी लेखकाचं अभिनंदन कौतुक करावं लागेल. पण नेहमीच हेतू चांगला असला म्हणजे त्यासाठी केलेला खटाटोप चांगला आणि अचूक असेलच असं नाही. आणि या लेखाच्या बाबतीत ते अगदी तंतोतंत खरं ठरलं आहे. सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं असा चांगला हेतू असतो आणि या चांगल्या हेतूने आजार होऊच नयेत म्हणून अनेक गोष्टी वर्तमान पत्रात, फेसबुक, वॉट्सॅपवर सुचवल्या जातात, जसं रोज व्यायाम केला पाहिजे, आहार कमी असला पाहिजे, आवश्यक तेवढं पाणी प्यायला पाहिजे, रोज थोडं तरी चाललं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सुर्य नमस्कार घातले पाहिजेत, सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण घेतलं पाहिजे, रोज सकाळी उठल्याबरोबर उषःपान केलं पाहिजे, अशा एक ना अनेक सूचना अतिशय प्रामाणिक आणि चांगला हेतू ठेवूनच केल्या जातात. आरोग्यशास्त्रानेही त्यासाठी आदर्श जीवनपद्धती कशी असावी हे फार पुर्वीच सांगून ठेवलं आहेच. अडचण अशी आहे की हे नियम पाळले जात नाहीत, ही आदर्श जीवन पद्धती पाळली जात नाही म्हणून आरोग्याच्या तक्रारी येतात आणि म्हणून डॉक्टरकडे जायची पाळी येते. आपल्याला आरोग्याच्या तक्रारी येतात म्हणून डॉक्टरचा सल्ला आपण घेतो. डॉक्टर स्वतःहून आपल्याकडे औषध द्यायला येत नसतो. आदर्श जीवन पद्धती, आदर्श व्यवस्था, आदर्श समाजव्यवस्था ग्रंथकारांनी, शास्त्रकारांनी आधीपासून सांगून ठेवल्या आहेत तसंच आदर्श वास्तु कशी असावी हेही सांगून ठेवलं आहे पण अडचण अशी आहे की आपण ते नियम, ती आदर्श व्यवस्था पाळत नाही आणि मग आजार झाला की औषध घ्यावं लागतं. चांगला डॉक्टर मिळाला, योग्य वेळी योग्य निदान आणि योग्य औषधोपचार मिळाले तसंच योग्य प्रकारे पथ्य पाळलं की आजार दूर होतो. पण चांगला डॉक्टर मिळाला नाही, निदान चुकलं, औषधोपचार चुकले, पथ्य पाळले नाही तर मग वरच्या लेखात म्हटल्याप्रमाणे "निर्बुद्ध लोक हजारो रुपये खर्च करून पस्तावतात" असं म्हणावं लागतं .

2)सगळेच वैद्य किंवा वास्तुतज्ञ प्रामाणिक सल्ला देणार नाहीत असं जर आपलं म्हणणं असेल तर काही प्रमाणात कदाचित खरं असेल ही. तरी सगळेच वैद्य, डॉक्टर, वास्तुतज्ञ लुटतात , अतार्किक, अशास्त्रीय, बिनबुडाचे उपाय सुचवतात हे मात्र असत्य विधान आहे. अशास्त्रीय किंवा बिनबुडाचे उपाय सुचवतात असं म्हणण्यासाठी आधी आपला स्वतःचा त्यातला अभ्यास असला पाहिजे. आणि तो असला तरी सरसकट सगळ्या वास्तुतज्ञांना असं म्हणणं ही चुकीचंच आहे.
अनेकवेळा आदर्श जीवनपद्धती न पाळल्यामुळे, आरोग्य विषयक मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यामुळे आजार होतात, तर अनेकदा हे आजार जन्मजात किंवा वंशपरंपरागत असतात. अनेकदा मुळातच शरीरांतर्गत काही दोष असतात म्हणून आजारांना तोंड द्यावं लागतं. आजार असल्यानंतर योग्य वैद्य निवडायची जबाबदारी मात्र आपलीच असते ना? whatsapp वर आलेल्या लहानमोठ्या टिप्स 'आयुर्वेदिक' च्या नावावर फॉरवर्ड केल्या जातात, इथे हेतू चांगला असला तरी ते forward करणारा आरोग्यशास्त्राचा जाणकार असेलच असं नाही. त्यामुळे अनेकदा या टिप्स अगदी दैवी वाटतात आकर्षक वाटतात "हा छोटासा घरगुती उपाय करा, कधीच डॉक्टरकडे जावं लागणार नाही" अशी आकर्षक वाक्य त्यामध्ये असतात. हेतू चांगला पण ज्ञान अपुरं. या लेखात नेमकं हेच दिसत आहे. लेख दिसायला आकर्षक आहे, लेखात सांगितलेले छोटे छोटे घरगुती उपाय सवयींमध्ये आणणं खरंच होतं का?... नाही होत... बरं या लेखात हे करा, ते करा अशा सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या परंपरेतून अनेकदा सांगितल्या गेल्या आहेतच. त्यामुळे 'हजारो वर्षे जे कोणी सांगितलं नाही असं काहीतरी विशेष असं' त्यात काही नाही. आपल्या उज्ज्वल परंपरेतून आलेल्या बर्‍याच चांगल्या गोष्टी वरच्या लेखात सांगितलेल्या असल्या तरी त्या सांगताना, त्याच उज्ज्वल परंपरेतील अतिशय सायंटिफिक शास्त्राला किंवा त्या शास्त्रातील जाणकारांना मात्र सरसकट नावं ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी?
मुळात शरीर निरोगी असेल पण जीवन पद्धती वाईट असेल तर आजार ओढवून घेतलेले असतात. पण शरीरच जन्मतः दोषपूर्ण असेल तर औषध घेण्याला पर्याय नाही. वास्तूचा मूळ सांगाडा किंवा रचनाच मुळातच निर्दोष असेल, आणि वास्तूचा वापर सुद्धा योग्य प्रकारे होत असेल तर वास्तु तज्ञाची गरजच नाही हे शंभर टक्के मान्य. वास्तु दोषविरहित आहे पण त्याचा वापर चुकीच्या पद्धती होतोय अशा परिस्थितीत सुद्धा योग्य सल्ल्याची गरज भासते. वास्तू मुळातच दोषपूर्ण असेल आणि वापरसुद्धा चुकीच्या पद्धतीने असेल, शिवाय कुटुंबीय एकमेकांशी विरोध करत असतील, वाद-विवाद करत असतील, अशांतता निर्माण करत असतील तर अशा परिस्थितीत देवच त्यांचं भलं करो.
जर वास्तूची रचनाच अचूक असेल तर वाद-विवाद मात्र आपोआपच कमी होतात, अनेक अडचणी आपोआप कमी होतात हा फक्त माझा किंवा माझ्या क्लायंट्स चा अनुभव नाही तर वास्तूच्या नियमां चे पालन करून बांधलेल्या वास्तूमध्ये येणाऱ्या चांगल्या अनुभवांसंबंधी विश्वकर्मा, अगस्ती मुनी, महामुनी मयन, राजा भोज अशा अनेक दिग्गज वास्तु तज्ञांचं मत उपलब्ध आहे.
आणखीन एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायची आहे की पिरॅमिड्स, मंत्रांची कॅसेट, कासव, मोडतोड या गोष्टी वास्तूच्या ग्रंथकारांनी सुचवलेल्या नाहीत. पिरॅमिड्स सारख्या गोष्टींचा तर उल्लेखच ग्रंथांमध्ये नाही, तरीसुद्धा एखादा वास्तु तज्ञ या गोष्टी सुचवत असेल तर तो दोष त्या विशिष्ट वास्तु तज्ञा पुरता मर्यादित आहे, तो सर्व वास्तू तज्ञांचा किंवा शास्त्राचा दोष नाही.

3) कधीकधी एखाद्याच्या शरीरात आंत्रपुच्छ वाढतं, ते आॅपरेट करावं लागतं, ते म्हणजे मोडतोड म्हणणार असू तर त्याचा परत विचार करण्याची गरज आहे. अतिशय चुकीच्या आणि अतिशय त्रासदायक अशा ठिकाणचे टॉयलेट किंवा एखादी वाईट गोष्ट क्वचित प्रसंगी एखादा चांगला वास्तुतज्ञ तोडायला सांगू शकतो, याचा अर्थ सगळेच वास्तुतज्ञ सरसकट तोडफोडच करायला सांगतात असं म्हणणं मात्र चुकीचं होईल. तसंच या लेखात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे कशीही दोषपूर्ण वास्तू असली तरी त्रास होणार नाही हे सांगणं सुद्धा मूर्खपणाचं अशास्त्रीय, अतार्किक होईल. हे म्हणजे whatsapp वरच्या आयुर्वेदाच्या टिप्स सारखं ज्ञान पाजळणं होईल. त्या पोस्ट मधील गोष्टींचा प्रत्यक्षात आयुर्वेदाशी कितपत संबंध असतो याचा शोधच घ्यावा लागेल.
वास्तुशास्त्राचा मूळ उद्देश हा वास्तूच्या ग्रंथकर्त्यांनी आधीच स्पष्ट केला आहे.
"वास्तुशास्त्रं प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया"
म्हणजे, मी वास्तुशास्त्र लोकांच्या हितासाठी सांगतो आहे. असं ग्रंथकार सांगतो आहे. त्या नंतर तो वास्तु कशाप्रकारे बांधावी म्हणजे ती हितकारक असेल तेच सांगतो. म्हणजेच वास्तुशास्त्राचा मूळ उद्देश उपाययोजना सांगणं हा नाही तर राहणाऱ्या लोकांना हितकारक होईल अशा प्रकारची वास्तू डिझाईन करण्यासंबंधी मार्गदर्शन हा वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. त्या पद्धतीने रचना असलेल्या vastu सरसकट मिळत नाहीत, म्हणून नाईलाजाने उपाय सांगावे लागतात. वास्तू म्हणजे चैतन्यमय स्पेस. 'वस्तू' ची व्याख्या आपलं शास्त्र सांगतं

"सर्वेश भूतेषु यद् वसती तद् वस्तु :"

सगळ्या भूतांमध्ये जे राहतं ते म्हणजे "वस्तू" म्हणजेच चैतन्य.
आणि हे चैतन्य ज्या ज्या गोष्टींच्या आश्रयाने राहतं त्या गोष्टी म्हणजे वास्तु होत. वास्तुशास्त्रीय दृष्टीने वास्तूची रचना करताना वास्तुचा आय, व्यय, योनी, अंश, नक्षत्र, आयु, वार, योग अशा 8 सूत्रांवर आधारित कॅलक्युलेशन्स करून त्या वास्तूची मोजमापे ठरवावी, जेणेकरून अशी विशिष्ट स्पंदनांनी युक्त असलेली space (वास्तु) त्या वास्तुमधे राहणाऱ्या कुटुंबीयांना अनुकूल अशी असते म्हणजेच कुटुंबियांच्या नक्षत्रांना अनुकूल असते.

4) वास्तूच्या निरनिराळ्या प्रकारांना 'ध्यान गर्भ', 'शक्ती गर्भ' अशा प्रकारची नावे आहेत म्हणजेच या "बिल्टस्पेस" ला 'गर्भ' अशी संज्ञा दिली आहे. गर्भ जेवढा निर्दोष तेवढा त्या गर्भातलं बाळ निकोप आणि निरोगी असं जन्माला येतं. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या निरोगी वास्तु म्हणजेच बिल्ट स्पेस या आपल्या इच्छा-आकांक्षा, स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रभावीपणे काम करू शकतात.
वरच्या लेखात शिव व शक्ति अशा शब्दांचा उल्लेख आला आहे, तो किती सखोल अर्थाने वापरला आहे देव जाणे. पण आपल्या सुदैवाने तो उल्लेख आला आहे. त्यामुळे त्याची थोडी तरी सखोल, शास्त्रीय आणि अर्थपूर्ण चर्चा इथे करायलाच हवी.
आपण नेहमी वास्तुपुरूष वास्तुपुरूष असा पुल्लिंगी उल्लेख करत असतो पण आपण बांधलेल्या व बंदिस्त केलेल्या पोकळीला/ बिल्ट स्पेसला मात्र ती वास्तु असे स्त्री लिंगी का संबोधतो? कधी विचार केलाय यावर? तो केला तर लक्षात येईल की आपली शास्त्र किती खोल विचार करतात.
चैतन्य म्हणजे शिव आहे. शिव तत्वाचा अंश. ते अतिशय निर्मितीक्षम आहे (potent). त्या चैतन्याला आपण वास्तुपुरूष म्हणतो. प्रत्येक बंदिस्त स्पेस मध्ये हे चैतन्य अस्तित्वात असतंच . मंत्रांच्या माध्यमातून ते आपण आणखी स्पंदनशील व निर्मिती क्षम बनवत असतो. प्रत्यक्षात आपल्या ईच्छा, आकांक्षा, स्वप्न, ध्येय, आराखडे, या सगळ्याचे मॅनिफेस्टेशन (मूर्त स्वरूपात येणं, प्रत्यक्षात येणं, घडणं,) हे या स्त्री रुपी बिल्ट स्पेस मधे म्हणजे ही जी स्त्री रुपी वास्तु आहे, त्यात होतं. बाळाचा जन्म ही असाच होतो नं? पुरुष तत्वाचं नुसतं निर्मिती क्षम बीज असून उपयोगाचं नाही प्रत्यक्ष निर्मिती साठी लागते ती निरोगी, निकोप स्त्री रुपी स्पेस. यातील वास्तु पुरुष हे चैतन्य बीज आहे ते म्हणजे potential energy. तर ती वास्तु म्हणजे स्त्री रुपी working force म्हणजे kinetic energy होय जीला आपलं तत्वज्ञान शक्ती म्हणतं.
वास्तुशांती करताना हे वास्तुपुरूष रुपी बीजाचे आपण प्रातिनिधिक रोपण त्या वास्तुमधे करत असतो. आता वास्तु जेवढी निरोगी, निर्दोष, तेवढं आपल्या ईच्छा आकांक्षा व स्वप्नांचं मॅनिफेस्टेशन जसंच्या तसं होईल. म्हणजेच आॅर्डरली मॅनिफेस्टेशन होईल, अन्यथा डिसऑर्डरली मॅनिफेस्टेशन होईल. म्हणजे अर्धवट स्वप्नपूर्ती.

5)वरच्या लेखात अजून एका गोष्टीचा उल्लेख आला ती गोष्ट म्हणजे मंत्रांची कॅसेट..वैयक्तिक पातळीवर मीही मंत्रांची कॅसेट, रेकॉर्ड किंवा मशिन्स लावायला सांगत नाही. कारण स्वत : मंत्र म्हटल्यास त्यामुळे मिळणारे परिणाम हे सर्वोत्तम असतात हाच माझा अनुभव आणि ठाम विश्वास आहे. पण याचा अर्थ असा नक्कीच घेता येणार नाही की दुसर्‍या व्यक्तिने मंत्र म्हटले किंवा मंत्रांची रेकॉर्ड वाजवली तर काहीच परिणाम मिळणार नाहीत. आपण घरी लघुरुद्र, स्वाहाकार, सप्तशती, नवचंडी करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपण स्वतःच मंत्रोच्चार करतो का. पण अशा गुरूजींकडून करवून घेतलेल्या मंत्रोच्चाराचाही आपल्याला परिणाम मिळतातच ना! पण तरीही वरच्या लेखाच्या लेखकाचा असा ठाम विश्‍वासच असेल आणि दावा असेल की मंत्रांच्या कॅसेट चा शून्य परिणाम मिळतो, तर माझी त्यांना एक विनंती आहे. त्यांनी एकदा एखादे कडाक्याचे भांडण किंवा वादविवाद, शिव्याशाप, आजारी माणसाचे कण्हणे असं रेकॉर्ड करुन स्वतःच्या घरात महिने दोन महिने सातत्याने ती कॅसेट वाजवावी आणि मग सप्रमाण, स्वानुभवाने छातीठोकपणे सिद्ध केलेल्या या प्रयोगाच्या आधारे कॅसेटचा उपयोग होत नाही असे सांगावे. आणि हे करणार नसाल तर मंत्रांच्या कॅसेटला सरसकट नावे तरी ठेऊ नये.
आपण जे ऐकतो, जे आपल्या कानावर पडतं, त्याचा आपल्या मनावर काही प्रमाणात तरी परिणाम होतो हे मान्य करावंच लागेल. रामदास स्वामींनी भक्ति ची व्याख्या करताना म्हटलं आहे की भक्ति म्हणजे त्याच्या पासून अजिबात विभक्त नाही अशी अवस्था असणे. आपल्या कडे श्रवणभक्ती असा शब्दप्रयोग रुढ आहे. म्हणजे फक्त श्रवणाने सुद्धा अशी 'विभक्त नाही' अशी अवस्था साधता येते. एखाद्या वास्तु तज्ञाने यजमानाला कदाचित अनेकदा सांगितलं असेल, सप्तशती करा, रामरक्षा म्हणा, हे करा, ते करा पण यजमान काही करत नाही, किंवा त्याला वेळच मिळत नाही म्हणून किमान काहीतरी चांगलं तरी कानावर पडावं या हेतूने मंत्रांची कॅसेट लावायला सांगितलेली असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ना. कदाचित ऐकता ऐकता अगदी क्षणभर जरी त्या विभक्त नाही अशा अवस्थेत यजमान गेला तरी खुप काही मिळाल्यासारखं आहे की. मी काही कॅसेट लावावी म्हणून हे सांगत नाही, तर कोणत्याही गोष्टीची दुसरी बाजू तपासून मगच आपलं मत मांडावं हा यामागचा हेतू आहे.
हे सगळं मांडण्याच्या मागे माझी एवढीच भावना आणि विनंती आहे की ज्या परंपरेतील चार चांगल्या गोष्टी आपण सांगतो आहे, त्या सांगत असताना त्याच परंपरेतील एखाद्या विज्ञानाधिष्ठीत शास्त्रातील गोष्टींचा, त्या शास्त्रातील जाणकारांचा अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सरसकटपणे अपमान करु नये. आपल्या परंपरेतील हे शास्त्र विज्ञानावर आधारित आहे. आणि त्याचे दाखले या शास्त्राच्या आधारे बांधलेल्या हजारो मंदिरं, वाडे, जयपूर जंतर-मंतर सारख्या वास्तु यांच्या माध्यमातून आजही जिवंत आहेत.

अधिक माहिती साठी संपर्क करा
अमोल लेले, तथास्तु वास्तु रिसर्च फाऊंडेशन, कल्याण.
9004813975 किंवा 8850517626या क्रमांकावर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वास्तुशांती

                                    वास्तुशांती   ( टीप : ज्यांचा भारतीय शास्त्रांवर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही. त्यामुळे त्यांनी आक्षेप कृपया मांडू नयेत. ज्या श्रद्धावंतांना खरोखरीच शंका आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.)                वास्तुशांती बद्दल अगदी जाणकार व अभ्यासकांच्या सुद्धा मनात काही गैरसमज आहेत असे गेल्या काही महिन्यांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे वास्तुशांती बद्दल मी काही लिहावे व गैरसमज दूर करावे अशी सूचना, विनंती काहीजण सातत्याने करत आहेत व त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करत आहेत. वेळेत लेख पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल या  सर्व शास्त्र प्रेमी मित्रांची आधी क्षमा मागतो.                             वास्तुशा...

वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु?

प्रश्न आहे वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु? इथे पुन्हा अगदी पायाभूत गोष्टीं (बेसिक्स) पासून विचार करावा लागेल. मुळात वास्तु म्हणजे काय? "प्रासादादिनी वास्त...